मालवण (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना नुकतीच करण्यात आली. या संघाच्या अध्यक्षपदी ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख आरेखक राजेंद्र हरी कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी ओझर विद्यामंदिरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी जाहीर
ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली आहे –
- अध्यक्ष – राजेंद्र कदम
- उपाध्यक्ष – उमेश कोदे
- सचिव – डी. डी. जाधव (प्रभारी मुख्याध्यापक)
- कोषाध्यक्ष – पांडुरंग राणे
- सदस्य – रोहन कदम, विशाल राणे, चंद्रशेखर कांबळी, मधुसूदन परुळेकर
- सल्लागार – विद्याधर कदम, विजय नातू, राकेश कदम
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार
नवीन कार्यकारिणीने ओझर विद्यामंदिरची विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी व्याख्याने व कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, तसेच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेणे आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे यासारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
या बैठकीसाठी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे विश्वस्त नंदकुमार राणे, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी रविराज जाधव तसेच शिक्षक शिवराम सावंत उपस्थित होते.
या प्रसंगी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कांस्यपदक मिळविणारी हर्षिका राकेश कदम, तसेच स्मृती उदय परब आणि योगेश यशवंत आयकर यांचा अध्यक्ष राजेंद्र कदम, संस्था संचालक नंदकुमार राणे आणि शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पांडुरंग राणे यांनी आभार प्रदर्शन केले.







