मालवण (प्रतिनिधी):
मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर–मालवण नव्या नळपाणी योजनेचे पाइपलाइन टाकण्याचे काम सध्या सुरू असून या कामात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. चौके येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना ठाकरे शिवसेना गटनेते महेंद्र म्हाडगुत आणि पाणीपुरवठा समिती सदस्य तपस्वी मयेकर यांनी काम बोगस पद्धतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त केली.
नगरसेवकांनी केलेल्या पाहणीत कामाच्या ठिकाणी एकही अभियंता किंवा नियंत्रणासाठी नियुक्त एजन्सीचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याचे दिसून आले. यावर त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कामाच्या ठिकाणी अधिकारी नसल्याचा आरोप
पाहणीनंतर बोलताना तपस्वी मयेकर म्हणाले की, मालवणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नळपाणी योजनेच्या साईटला भेट दिली असता बोगस पद्धतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. कामाच्या ठिकाणी कोणताही अधिकारी किंवा अभियंता नसताना कामगार स्वतःच काम करत असल्याचे आढळले.
तसेच पाइपलाइन टाकताना योग्य लेव्हलिंग नाही, आवश्यक खोदाईही झालेली नाही. तसेच लिकेज टेस्ट करण्यापूर्वीच पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाइप जोडण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह
नळपाणी योजनेतील पाइप हायड्रॉलिक प्रेसिंग पद्धतीने जोडणे आवश्यक असते, जेणेकरून जॉइंटमधून पाणी गळती होऊ नये. मात्र प्रत्यक्ष पाहणीत पाइप गावठी पद्धतीने जोडले जात असल्याचे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता हीच हायड्रॉलिक प्रेसिंग पद्धत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा मयेकर यांनी केला.
खासगी जागेतून पाइपलाइन टाकण्याचा मुद्दा
नळपाणी योजनेची पाइपलाइन रस्त्याच्या कडेला टाकणे अपेक्षित असताना ती जंगलमय भागातून आणि काही ठिकाणी खासगी जागेतून टाकली जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला. भविष्यात पाइपलाइन लीक झाल्यास खासगी जागेत दुरुस्ती करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. याबाबत प्रशासनाकडे ठोस उत्तर नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘भुयारी गटार योजनेसारखी अवस्था होण्याची भीती’
या प्रकल्पात योग्य नियंत्रण नसल्यास भुयारी गटार योजनेसारखीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याचे तपस्वी मयेकर यांनी व्यक्त केले. तसेच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीची माहिती पाणीपुरवठा समिती सदस्यांना देण्यात आली नसल्याने या सर्व बाबी जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







