कोकणशक्ती – मुंबई प्रतिनिधी
सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी काही अटींसह अधिसूचना जारी केली आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत एक अधिसचूना जारी केली होती. या शाळेच्या १ किमी परिघात राहणाऱ्यांनाच RTE अंतर्गत प्रवेश दिला जाईल, असे नमुद करण्यात आले होते. पण या अधिसूचनेला आव्हान देत आशिष फुलझेले, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या जाटक अटींना विरोध केला होता.
या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशांवर लादलेल्या १ किमी भौगोलिक मर्यादा आणि शाळा निवड मर्यादेला स्थगिती दिली आहे. सरकारचे हे पाऊल केवळ मागील न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करत नाही तर मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचेही उल्लंघन करते, असे न्यायमूर्तींना म्हटले आहे.
ऑनलाइन प्रणालीमध्ये गुगल मॅप्सद्वारे निवासस्थानापासून केवळ १ किलोमीटरच्या परिघातील शाळा दिसतील, हा निर्बंध न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच, पालकांना जास्तीत जास्त १० शाळा निवडण्याची असलेली सक्ती आणि केवळ जवळच्या शाळा पोर्टलवर दिसणे, या तरतुदीही रद्द करण्यात आल्या आहेत.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, हे निर्बंध १९ जुलै २०२४ रोजी ‘अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा’ प्रकरणात दिलेल्या निकालाचे उल्लंघन आहेत. आरटीई कायद्याच्या कलम १२(१)(क) मध्ये अंतराची कोणतीही अट नाही. कोणताही सरकारी नियम मूळ कायद्याला (Main Act) रद्द करू शकत नाही. सरकारी शाळा जवळ असल्या तरी, खासगी विनाअनुदानित शाळांनी वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. सरकारचे हे निर्बंध संविधानाच्या कलम १४, २१ आणि २१अ (शिक्षणाचा अधिकार) च्या विरोधात आहेत.
याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील जयना कोठारी, पायल गायकवाड आणि अधिवक्ता दीपांकर कांबळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आपल्या ऑनलाइन प्रणालीमध्ये तातडीने आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून कायद्यानुसार गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.







