Renowned gynecologist Dr. Shilpa Zhantye’s English poetry collection “100 Shilpa Kavita” will be unveiled in Malvan, reflecting life experiences, motherhood, positivity, and inspirational thoughts through 100 meaningful poems.
मालवण, दि. प्रतिनिधी :
मानवी भावविश्व, मातृत्वाचा स्पर्श आणि जीवनातील अनुभवांचे शब्दरूप म्हणजे कविता… आणि अशाच अनुभवातून साकारलेला मालवण येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झांट्ये यांचा ‘१०० शिल्पा कविता’ हा इंग्रजी काव्यसंग्रह आज साहित्यप्रेमींच्या भेटीला येत आहे.
रविवार, दि. १ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता रेवतळे येथील झांट्ये हॉस्पिटलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
वैद्यकीय व्यवसायाच्या धावपळीच्या जगात रुग्णांच्या वेदना, प्रसूतीतील संघर्ष, नवजीवनाचा आनंद आणि स्त्रीमनातील असंख्य भावना जवळून अनुभवताना डॉ. झांट्ये यांच्या मनात साठलेले अनुभव कवितांच्या रूपाने उमलले. उपचार करताना पाहिलेल्या आयुष्याच्या विविध छटा त्यांनी संवेदनशील शब्दांत मांडल्या आहेत.
या संग्रहातील कविता केवळ भावनांची अभिव्यक्ती नसून जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा देतात. ‘Gifts for Free’ या कवितेतून निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेल्या अमूल्य देणग्यांची जाणीव करून देताना आधुनिक जीवनशैलीत हरवलेल्या साध्या आनंदांची आठवण करून दिली आहे. तर ‘Is Old Really Gold’ या कवितेत आधुनिकतेच्या प्रवाहात आपण परंपरा, संस्कार आणि ज्येष्ठांचे अनुभव विसरत चाललो आहोत का, असा विचारप्रवर्तक प्रश्न उपस्थित केला आहे.
आपल्या साहित्यिक प्रवासाचा लाभ भावी पिढीपर्यंत पोहोचावा या हेतूने या काव्यसंग्रहाच्या काही प्रती शाळा व वाचनालयांना विनामूल्य देण्याचा स्तुत्य उपक्रमही डॉ. झांट्ये यांनी हाती घेतला आहे.
वैद्यकीय सेवेसोबत जपलेली साहित्यसाधना आणि जीवनानुभवातून जन्मलेले हे शब्दविश्व वाचकांच्या मनाला नवी ऊर्जा देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





