मालवण, दि. प्रतिनिधी : खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रयत्नातून जिल्हा नगरोत्थान निधीतून मालवण नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १० मधील विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली.
मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगावकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले की, नगरपालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांनी विविध प्रभागांतील विकासकामांच्या मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्यांनुसार प्रस्ताव आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा नगरोत्थान निधीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
या निधीतून संरक्षक भिंतीचे बांधकाम, कॉंक्रिट रस्ते, आरसीसी गटारे, पायवाटांवर पेव्हर ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, स्मशानभूमीतील सुविधा उभारणी आदी एकूण १४ विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे.
मालवण शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत जनतेला दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने निधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही नगराध्यक्षा वराडकर यांनी दिली.
मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीला गती
दरम्यान, मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत कलाकारांनी व्यक्त केलेल्या नाराजीची नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. नगराध्यक्षा व नगरसेवकांनी नाट्यगृहाची पाहणी करून परिस्थितीची माहिती आमदार निलेश राणे तसेच मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही पाहणी करून आवश्यक सूचना केल्या असून जिल्हाधिकाऱ्यांकडून नाट्यगृह दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रारंभी किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून पुढील टप्प्यात शासन निधीतून उर्वरित कामे पूर्ण करून नाट्यगृह पुन्हा नाट्यप्रयोगांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
मामा वरेरकर नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.







