A Special Mega Specialist Health Camp will be held on 27 February 2026 at Sub-District Hospital, Kankavli, from 9 AM to 3 PM, offering expert consultations in cardiology, cancer, gynecology, orthopedics, surgery, urology, thyroid, and diabetes care for district patients.
कणकवली : जिल्ह्यातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत ‘विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या मेगा आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हृदयरोग, कर्करोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सा व पोटाचे विकार, मूत्ररोग तसेच ग्रंथीरोग अशा विविध आजारांवर विशेष तपासणी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. छातीत दुखणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, स्तनातील गाठ, तोंडातील न भरणाऱ्या जखमा, मासिक पाळीतील समस्या, हाडे-सांधेदुखी, हर्निया, किडनी स्टोन, प्रोस्टेट विकार, थायरॉईड व मधुमेह आदी लक्षणांची तपासणी तज्ज्ञांकडून केली जाणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरात न जाता तज्ञ वैद्यकीय सेवा मिळाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी जिल्ह्यातील संबंधित व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.






