मालवण प्रतिनिधी
मालवण शहरातील दांडी येथील रहिवासी सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्यावर गंभीर आजारामुळे उपचार सुरू असून, त्यांच्या मदतीसाठी धुरीवाडा साईनगर रहिवासी संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या वतीने त्यांना ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
सौ. रेवंडकर या पूर्वाश्रमीच्या नंदा साळसकर असून धुरीवाडा साईनगर येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पोटात २४ x २५ मिमीचा ट्यूमर असून फुफ्फुसातही पाणी झाले आहे. त्यांच्यावर सध्या कणकवली येथील डॉ. बिरमोळे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा मोठा खर्च पेलणे कुटुंबाला कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धुरीवाडा साईनगर रहिवासी संघाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. मदतीपैकी ५० हजार रुपये थेट रुग्णालयाकडे, तर उर्वरित १६ हजार रुपये सौ. रेवंडकर यांचे पती रवींद्र रेवंडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी राजू बिडये, महेश सारंग, निलेश तळाशीलकर, गणेश परब आणि रवींद्र रेवंडकर उपस्थित होते.
रवींद्र रेवंडकर हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी शक्य ती आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







