मालवण (प्रतिनिधी) :
वाढते वय, बदलती जीवनशैली आणि शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची घनता कमी होण्याचा तसेच ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्याची वेळेत तपासणी व्हावी या उद्देशाने लिमये हॉस्पिटल, मालवण आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भरड येथील लिमये हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
या शिबिरामध्ये ४० वर्षांवरील सर्व महिला तसेच ६० वर्षांवरील सर्व पुरुषांनी आवर्जून बीएमडी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या तपासणीद्वारे हाडांची घनता मोजून ऑस्टिओपोरोसिसचा संभाव्य धोका प्रारंभीच ओळखता येतो. त्यामुळे योग्य वेळी उपचार आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात.
बीएमडी तपासणी ही अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण होणारी, वेदनारहित आणि पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया असून नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लिमये हॉस्पिटल आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.







