मालवण (प्रतिनिधी) :
हुंडाबळी ही समाजाला लागलेली घातक व अनिष्ट प्रथा असून तिच्या निर्मूलनासाठी जनजागृती होणे काळाची गरज असल्याचा संदेश देत जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत अभय केंद्र मालवण व सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कै. गंगुबाई कृष्णराव सिताराम देसाई सभागृह, मालवण येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत, अभय केंद्र मालवणचे संरक्षण अधिकारी गौरव एखंडे, वन स्टॉप सेंटरच्या ॲड. मीनाक्षी नाईक, ॲड. नंदिनी मोडकर, निकिता पाटकर, प्रा. दत्ताराम माळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव एखंडे यांनी केले.
यावेळी ॲड. मीनाक्षी नाईक यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ तसेच पोक्सो कायदा याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महिलांचे कायदेशीर हक्क आणि संरक्षणाची माहिती दिली. ॲड. नंदिनी मोडकर यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम व वाढती सायबर गुन्हेगारी याबाबत मार्गदर्शन केले.
मेघा वजराटकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ अंतर्गत महिलांना उपलब्ध असलेल्या सुविधा व महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी विधी सेवा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या जनजागृती कार्यक्रमास सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण साबळे यांनी केले.







