मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवासाला यंदा गोडवा मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या खानपान आणि पर्यटन विभागाच्या वतीने मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना उकडीचे मोदक देण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव धावणाऱ्या गाडी क्रमांक २२११९ तसेच मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धावणाऱ्या गाडी क्रमांक २२१२० मधील सर्व प्रवाशांना गणेशोत्सवाच्या कालावधीत मोदकांचे वितरण केले जाणार आहे. नियमित मेन्यूचा भाग नसलेली ही विशेष मेजवानी केवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे रवाना होतात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आयआरसीटीसीकडून या विशेष उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गणरायाचा आवडता नैवेद्य म्हणून उकडीच्या मोदकाला विशेष महत्त्व असून, याच पारंपरिक पदार्थातून प्रवाशांना गावाकडच्या सणाची आणि घरच्या चवीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
धावत्या तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मोदक मिळणार असल्याने त्यांच्या कोकणवारीला सणासुदीची खास जोड मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवासातील हा गोड अनुभव निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.
तेजसचा वेग आणि मोदकांचा गोडवा… गणेशोत्सवाच्या कोकणवारीला मिळणार खास सणासुदीची चव!







