मुंबई | प्रतिनिधी :
कोकणातील मराठी शाळांचे संवर्धन, शाळा समायोजन प्रक्रिया तसेच शिक्षण खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. या बैठकीत कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणे राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सामंत, महेंद्र दळवी, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच विविध शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शाळांचे समायोजन करताना कोकणातील डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी शासन कटिबद्ध असून पहिली ते नववीपर्यंत किमान दोन विद्यार्थी असले तरी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे.
नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असल्यास त्यांना जवळच्या शाळांमध्ये समायोजित करून शिक्षणाची सातत्यता राखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देत अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हा शासनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगताना शाळांचा पट वाढवण्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण व सकारात्मक उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले.
कोकण विभागातील विशेष परिस्थिती लक्षात घेऊन रिक्त शिक्षक पदे भरणे, मराठी व उर्दू विषयांचे शिक्षक उपलब्ध करून देणे आदी मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे कोकणातील ग्रामीण व दुर्गम भागातील शैक्षणिक व्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







