वृक्षारोपण, गुरुवंदना आणि क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान
मालवण | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ मालवणच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये शाळा परिसरात वृक्षारोपण, सेवानिवृत्त शिक्षिकेचा गुरुवंदना सत्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षकाचा गौरव करण्यात आला.
यावेळी काळसे हायस्कूलच्या परिसरात रोटरी क्लबच्या सदस्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर काळसे हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शालिनी परुळेकर यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘गुरुवंदना’ कार्यक्रमांतर्गत सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात कुंभारमाठ येथील ज्येष्ठ बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक महेश परब यांचाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल रोटरी क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांना रोटरी क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षा नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदार प्रदीप सामंत तसेच प्रदीप जोशी, सुहास ओरसकर, महादेव पाटकर, अभय कदम, रमाकांत वाक्कर, रंजन तांबे यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.







