मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील देवबाग येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड (वय २०, रा. विजापूर) या युवकाचा मृतदेह हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या स्विमिंग पूलच्या फिल्टर रूममधील केबिनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी आढळून आला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाने मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली. चंद्रशेखर राठोड हा मार्च महिन्यात संबंधित हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामासाठी दाखल झाला होता. गुरुवारी सकाळी तो राहत असलेल्या खोलीत दिसून न आल्याने व्यवस्थापकाने त्याचा शोध सुरू केला. मात्र तो सापडत नसल्याने हॉटेल मालकाला याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर हा स्विमिंग पूलच्या फिल्टर रूमच्या दिशेने जाताना दिसून आला. त्यानुसार सकाळी सुमारे ९ वाजता व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी फिल्टर रूममध्ये शोध घेतला असता तेथील केबिनमध्ये लोखंडी बाराला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि मालवण पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक खाडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व प्राथमिक तपास सुरू केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पेडणेकर करीत आहे







