१२ सागरी मैलांच्या हद्दीत मासेमारीस मनाई; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
मालवण | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, माशांच्या विविध प्रजातींचे प्रजोत्पादन आणि शाश्वत मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेली पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांच्या हद्दीत या कालावधीत सर्व यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास पूर्णतः बंदी असल्याची माहिती सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार १ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पावसाळा हा बहुतांश सागरी माशांचा प्रजोत्पादनाचा काळ असल्याने या काळात मासेमारी केल्यास मत्स्यसंपत्तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि भविष्यातील शाश्वत मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने ही बंदी महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, केंद्र सरकारने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone) १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मासेमारी बंदी लागू केली होती. त्यामुळे या क्षेत्रात १ ऑगस्टपासून मासेमारीस परवानगी असली, तरी राज्याच्या १२ सागरी मैलांच्या हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या सर्व पात्र नौकांनी ‘एक्सक्लूसिव्ह इकॉनॉमिक झोन रुल्स, २०२५’चे काटेकोर पालन करून शाश्वत पद्धतीने मासेमारी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बंदीच्या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना कोणतीही नौका आढळल्यास, ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१’ (सुधारणा २०२१) अंतर्गत संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.
मत्स्यसंपत्तीचे संरक्षण, पारंपरिक मच्छीमारांचे हित आणि भविष्यातील शाश्वत मत्स्यव्यवसाय लक्षात घेऊन सर्व मच्छीमारांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहआयुक्त महेश देवरे यांनी केले आहे.







