मालवण, प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वाढलेले रान आणि गवत स्वखर्चातून कापून परिसर स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी राबविला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
या उपक्रमांतर्गत दोन ग्रासकटरच्या साहाय्याने दिवसभर शाळेचा परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरातील वाढलेले रान आणि गवत कापून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक झाला असून विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून होणारा संभाव्य धोका कमी होण्यास मदत झाली आहे.
शिक्षण संस्थेच्या परिसराची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी न मानता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून स्वखर्चातून हा उपक्रम राबविणाऱ्या हनुमंत प्रभू यांच्या कार्याचे विद्यार्थ्यांचे पालक, संस्था सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष कौतुक केले. तसेच ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.







