१८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड; भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक निवड प्रक्रिया
मालवण, प्रतिनिधी :
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेत विविध शारीरिक व नेतृत्वगुणांच्या निकषांवर आधारित चाचण्यांनंतर एकूण १८ विद्यार्थ्यांची एनसीसी कॅडेट म्हणून अंतिम निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया ५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार प्रदीप पाटील (महाराष्ट्र) आणि सुभेदार महेंद्रसिंग (उत्तराखंड) यांनी विद्यार्थ्यांची धावणे, उंची, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि नेतृत्वगुण यांसह विविध निकषांवर चाचणी घेऊन पारदर्शक पद्धतीने निवड केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते यांच्या हस्ते उपस्थित सैन्याधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रा. राबते यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविण्यात एनसीसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. महाविद्यालयात एनसीसीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधी, साहसी उपक्रम, सैन्यदलातील करिअरच्या संधी आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. अन्वेषा कदम, एनसीसीचे वरिष्ठ कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतिम निवड झालेल्या सर्व १८ कॅडेट्सचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि एनसीसी विभागाकडून अभिनंदन करण्यात आले.







