मालवण | प्रतिनिधी
“विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशात सातत्य राखावे. आपल्या गावाचा, शाळेचा आणि पालकांचा अभिमान जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा. आजचा सन्मान ही अंतिम मंजिल नसून नव्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा उद्योजक डॉ. दीपक परब यांनी केले.
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, शिक्षक सन्मान व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर लोकल कमिटीचे अध्यक्ष राजन परब, उद्योजिका राधिका परब, विठ्ठल लाकम, प्रमोद खाडिलकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, डॉ. सुधीर मेहेंदळे, संजय बागवे, अर्चना कोदे, अरुण बागवे, प्रदीप भोगले, पंढरीनाथ नाचणकर, अप्पा परब, एस. आर. कांबळे, ज्ञानदेव पाटील, बाळू परब, राणे, उदय बागवे, अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. परब म्हणाले, “संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारी मसुरे एज्युकेशन सोसायटी ही बहुधा एकमेव संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्था, शाळा आणि पालकांचा मोठा वाटा असतो. माजी विद्यार्थ्यांचा मजबूत सहभाग असलेल्या संस्थेचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते.”
कै. मदन बागवे शिक्षण निधी तसेच विविध दात्यांच्या ठेवींमधून या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकल कमिटीचे अध्यक्ष राजन परब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, मिळालेल्या प्रत्येक पारितोषिकामागे पालक आणि शिक्षकांचे परिश्रम असतात. त्यामुळे हा सन्मान अधिक मोठ्या यशासाठी प्रेरणादायी ठरावा, असे आवाहन केले. तर विठ्ठल लाकम यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पालकांनी सातत्याने लक्ष द्यावे आणि कठोर परिश्रमातूनच यश संपादन करता येते, असे सांगितले.
यावेळी समीर नाईक यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मानसी पेडणेकर आणि कुशल सावंत यांना होतकरू विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास विश्वनाथ परब, शशांक पिंगुळकर, शहाजी चौगुले, रमेश पाताडे, विशाखा जाधव, आर्या भोगले, प्रगती मोरे, मंदार पाटील, सायली म्हाडगूत, भानुदास परब, अनिल मेस्त्री, हरी ठाकूर यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर यांनी केले. सूत्रसंचालन दयानंद पेडणेकर यांनी केले, तर एस. आर. कांबळे यांनी आभार मानले.






