रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव
मालवण | प्रतिनिधी
“विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. अनेकांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. प्रेरणेशिवाय व्यक्तिमत्त्व घडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींच्या चरित्रातून प्रेरणा घेत ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे आणि व्यसनांपासून कायम दूर राहावे,” असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी व राज्य शासन पुरस्कारप्राप्त डॉ. उत्तम फोंडेकर यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लब ऑफ मालवणच्या वतीने भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आणि डॉ. फोंडेकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबा व्यवसायातील उल्लेखनीय प्रगती तसेच लाल शेवग्याचा नवीन वाण विकसित करून त्याचे पेटंट मिळविल्याबद्दल रोटरी क्लबतर्फे डॉ. फोंडेकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात व्यासमुनी आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. रोटरी क्लबच्या सचिव प्रविणा शिंदे यांनी प्रास्ताविक करत गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. फोंडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यशासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत चांगले संस्कार आणि व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षा नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदार प्रदीप सामंत, सदस्य प्रदीप जोशी, सुहास ओरसकर, महादेव पाटकर, अभय कदम, रमाकांत वाक्कर, रंजन तांबे तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा शिंदे यांनी केले.






