मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा येथे अनधिकृतपणे भरविण्यात येणारा आठवडा बाजार तातडीने बंद करून पूर्वापार परंपरेनुसार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेतच एकत्रित आठवडा बाजार भरविण्यात यावा, अशी आग्रही मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मालवण नगरपालिकेकडे केली आहे.
या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी मालवण नगरपालिकेत धडक देत नगराध्यक्षा ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांची भेट घेतली. यावेळी देऊळवाडा येथील आठवडा बाजारामुळे सोमवार पेठेतील व्यापारी, दुकानदार तसेच भाजी विक्रेता महिलांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, मालवणच्या सोमवार पेठेत शिवकालापासून पारंपरिक आठवडा बाजार भरत आला आहे. सहा वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देऊळवाडा येथे आठवडा बाजार सुरू करण्यात आला होता. मात्र कोरोनानंतरही हा बाजार सुरूच असून, तो अनधिकृतपणे भरत असल्याने मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे देऊळवाडा येथील आठवडा बाजार तातडीने बंद करून सर्व विक्रेत्यांना सोमवार पेठेतील पारंपरिक बाजारात स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावर नगराध्यक्षा ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी व्यापाऱ्यांची मागणी गांभीर्याने घेतली असून, नगरपालिकेच्या सभेत या विषयावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी बांधव तसेच महिला विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







