सागरी महामार्गावरील बाजार कायम ठेवण्याची मागणी; नगरपालिकेला निवेदन देणार
मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा-सागरी महामार्गावर भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद करून तो पूर्वीप्रमाणे सोमवारपेठेत हलविण्याच्या प्रस्तावाला देऊळवाडा परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. देऊळवाडा मित्रमंडळाच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत बाजार कोणत्याही परिस्थितीत हलवू नये, अशी एकमुखी भूमिका नागरिकांनी घेतली असून यासंदर्भात मालवण नगरपालिकेला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना काळापासून सोमवारपेठेतील आठवडा बाजाराचे विभाजन करून देऊळवाडा-सागरी महामार्गावर बाजार भरविण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे देऊळवाडा, एसटी स्थानक परिसर, रेवतळे, वायरी, आडवण, आडारी तसेच खैदा, कातवड, कुंभारमाठ, घुमडे, आनंद आदी गावांतील नागरिकांना बाजारपेठ सहज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे नागरिकांनी बैठकीत नमूद केले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, देऊळवाडा बाजारापर्यंत परिसरातील अनेक गावांमधून अवघ्या १० ते १५ मिनिटांत पोहोचता येते. मात्र बाजार सोमवारपेठेत हलविल्यास वाहतूक कोंडीमुळे किमान १५ ते २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागेल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा मोठा फटका बसेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
बैठकीत बोलताना नागरिकांनी स्पष्ट केले की, देऊळवाडा बाजारामुळे सोमवारपेठेतील गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. बाजाराच्या ठिकाणी वाहतुकीची काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करावे; मात्र बाजार स्थलांतरित करू नये, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बाजार हा केवळ व्यापारी व्यवहाराचा विषय नसून ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना आणि सोयीचा विचार करून देऊळवाडा येथील आठवडा बाजार पूर्ववत सुरू ठेवावा, अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली.
बैठकीस देऊळवाडा व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक तसेच विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. लवकरच मालवण नगरपालिकेला निवेदन देऊन बाजार बंद किंवा स्थलांतरित करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी गणेश गावकर, हरेश फणसेकर, पुनम चव्हाण, नीना मुंबरकर, जगदीश गावकर, सौगंधराज बादेकर, उत्सुक गावकर, ऍड. अक्षय सामंत, नामदेव घाडीगावकर, बंटी चव्हाण, पराग चव्हाण, भूषण चव्हाण, दशरथ कवटकर, भूषण म्हापणकर, किसन मांजरेकर, महेश गावकर, संकेत भाटे, शिवाजी म्हापणकर, पांडू फणसेकर, समीर शिंदे, केदार गावकर, नितीन तोडणकर, प्रथमेश मालवणकर, सुहास वालावलकर, राहुल केळुसकर, अक्षय माणगावकर, प्रमोद मराळ, मधुरा तुळसकर, राज मोंडकर, किरण चव्हाण, रवी मालवणकर, उमेश चव्हाण, कमा गावकर, ऍड. सुमित जाधव, सुभाष मालवणकर, दर्शन मुंबरकर, प्रमोद गावकर, हरेश मुंबरकर, दशरथ वालावलकर, मंदार गावकर, श्रेयस माणगावकर, विलास अभ्यंकर, गौरव लाड, सुहास गावकर, शेखर केळुसकर, सोहम देऊलकर, शीला चव्हाण, विश्वास आचरेकर, सोमेश गावकर, राहुल वीर, चेतन वीर, युवराज गावकर, नागेश कांदळकर, दिनेश किडये, अभिषेक कांदळकर, सुशांत किडये, राजन गावकर, संतोष इब्रामपुरकर, रवी कासले, दिंगबर बगाड, रमाकांत फाटक, अमित बोर्डवेकर व इतर नागरिक, महिला आदी उपस्थित होते







