मालवण | प्रतिनिधी
मालवण-कसाल महामार्गावरील कुपेरी घाटीतील धोकादायक वळणावर चिऱ्याने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक आणि क्लीनर सुदैवाने बचावले आहेत. स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील हा ट्रक चिरे भरून चौकेच्या दिशेकडून कसालच्या दिशेने जात होता. कुपेरी घाटीतील मारुती मंदिराजवळील धोकादायक वळणावर भूमिगत वीजवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या साईडपट्टीतील चरात ट्रकचे चाक रुतले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.
चालकाने ट्रकवरील नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला खाली घसरून पलटी झाला. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालक व क्लीनरला बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, कुपेरी घाटीतील या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.







