मालवण | प्रतिनिधी :
चौके गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करण्यात येतील तसेच चौके ग्रामपंचायत इमारतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली. चौके ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
चौके ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. अक्षता गावडे आणि पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व मालवणचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पी. के. चौकेकर होते. व्यासपीठावर माजी सरपंच राजा गावडे, सुरेश चौकेकर, सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी, उद्योजक नाना आंबेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सरपंच पी. के. चौकेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच राज्य व केंद्र शासनात महायुतीची सत्ता असल्याने विकासकामे राबविताना कोणतीही अडचण येणार नाही. गावाच्या विकासासाठी आवश्यक कामांचा आराखडा तयार ठेवावा. भराडी मंदिर परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांचा विचार करून प्रत्येक गावात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी प्रशासनाच्या स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी अक्षता गावडे, मानसी भोगावकर, माजी सरपंच सुरेश चौकेकर, बिजेंद्र गावडे तसेच सदाशिव गावडे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान दत्ता सामंत, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण व माजी सरपंच राजा गावडे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी निकम यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, माजी सरपंच मधुकर चौकेकर, सचिन आंबेरकर, मंगेश पात्रे, मोहन गावडे, दीनानाथ गावडे, रमाकांत देसाई, बंड्या गावडे, श्रीमती निरा सावंत, उदय गावडे, विनायक गावडे, चिरेखान संघटनेचे अध्यक्ष दत्ता गावडे, प्रमोद भोगावकर, पोलीस पाटील रोहन चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







