देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव व समाजबांधवांचा सत्कार उत्साहात संपन्न
मालवण | प्रतिनिधी
“गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने विद्यार्थी गुणगौरव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून मालवण देवळी समाज मंडळाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून इतर शाखांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन देवळी समाज हितवर्धक मंडळ, सिंधुदुर्गचे खजिनदार तथा ज्येष्ठ समाजबांधव रमेश नरसुले यांनी केले.
देवळी समाज हितवर्धक मंडळ, सिंधुदुर्ग शाखा मालवणच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांच्या सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मालवण-वायरी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर, जिल्हा सचिव विष्णू चौकेकर, पंचायत समिती सदस्या माधुरी मसुरकर, प्रदीप श्रावणकर, सुधाकर वेंगुर्लेकर, देविदास वेरलकर, ॲड. सायली आचरेकर, ॲड. अनघा तेंडोलकर, अरविंद तेंडोलकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी रमेश नरसुले म्हणाले, जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रवृत्तींना समाजाने संघटितपणे उत्तर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाविषयी आदराची भावना जपून सामाजिक बांधिलकीही जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी मालवण शाखेच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत समाजातील प्रत्येक कुटुंबाने जिल्हा मंडळाचे सभासद होऊन समाजाला आर्थिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढीच समाजाची खरी ताकद असून प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वातून देवळी समाजाची ओळख अधिक भक्कम करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी समाजातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे गुणवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकृष्ण तळवडेकर, मधुसूदन परुळेकर, विष्णू चौकेकर, संतोष देऊलकर, सायली आचरेकर, वसंत वराडकर, अनिल तोंडवळकर, बाबल नांदोसकर, हरिश्चंद्र तळवडेकर, उमेश श्रावणकर, विपुल माळगावकर, देविदास वेरलकर, पूजा वेरलकर, हेमंत तळवडेकर, पूर्वा तळवडेकर आणि लौकिक तळवडेकर यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू उर्फ रमेश चौकेकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार देविदास वेरलकर यांनी मानले.







