मालवण (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना दिली. शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित सुमारे १५० कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि आदरभावनेतून शिवचरित्र साकारले. स्टोन पेंटिंग, पेन्सिल स्केच, वॉटर कलर, पोस्टर कलर पेंटिंग, टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले किल्ले, मातीपासून बनवलेली शिल्पे, अक्षरचित्र, विविध वॉल हँगिंग, राजमुद्रा अशा विविध कलाप्रकारांचा समावेश या प्रदर्शनात होता. या उपक्रमासाठी कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
या प्रदर्शनाचे उद्घाटन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक आणि शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषी नाईक तसेच डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयीची आवड आणि शिवरायांप्रती असलेला अभिमान अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







