मालवण (प्रतिनिधी) : आचरे पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेले पं. स. सदस्य गणेश तोंडवळकर तसेच शिरवंडे पंचायत समिती मतदारसंघातून विजय मिळविणारे पं. स. सदस्य दिपक चव्हाण यांचा मालवण व सावंतवाडी परीट समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
मालवण तालुका परीट समाज सेवा संघ आणि सावंतवाडी तालुका परीट समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पार पडला. हा कार्यक्रम मालवण तालुका परीट समाज सेवा संघाचे अध्यक्ष मोहन वालकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष दिलीप भालेकर, उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, सावंतवाडी तालुका परीट समाज सेवा संघाचे अध्यक्ष व हॉटेल व्यवसायिक राजू भालेकर, मालवण तालुका संघाचे अध्यक्ष मोहन वालकर, खजिनदार आप्पा परुळेकर तसेच सदस्य उत्तम चव्हाण, गणेश चव्हाण, विजय नेमळेकर, किरण चव्हाण, निलेश वालकर, सौ. माधवी वालकर आदी उपस्थित होते.
दोन्ही पंचायत समिती सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
समाजबांधवांना आवाहन
कार्यक्रमाचे निवेदन हेमंत वालकर यांनी केले. जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्षांनी दि. २३ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे आयोजित संत गाडगेबाबा महाराज जयंती कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच तालुका अध्यक्षांनी आभार प्रदर्शन करत जिल्हा व तालुका स्तरावरील परीट समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजविकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.







