Thousands of devotees from Sindhudurg and across India gathered at Nirvana Sphatik Shivling Temple in Savarwad, Malvan, to celebrate Maha Shivratri with Rudrabhishek, Yajna, chanting and grand rituals.
मालवण (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विशेष चर्चेत असलेल्या सावरवाड येथील निर्वाण स्फटीक शिवलिंग मंदिरात आज महाशिवरात्री उत्सवाचा भव्य आणि भक्तिमय प्रारंभ झाला. “हर हर महादेव… जय भोलेनाथ”च्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच देशातील विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी हिमालयीन स्फटीकापासून साकारलेल्या सुमारे पाच फूट उंच भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे पूजन केले.
मालवण तालुक्यातील सावरवाड येथे हॉटेल चिकू सावली नजीक नव्याने स्थापन झालेल्या या मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली, भोपाळ आदी ठिकाणांहून क्रिया योग साधक तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराचे प्रमुख श्री. रुद्रराज यांच्या पौराहित्याखाली स्फटीक शिवलिंगाची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. रुद्राभिषेक व गायत्री यज्ञाने उत्सवाची सुरुवात झाली. धुनी प्रज्वलित करून उपस्थित साधक व भाविकांनी १०८ वेळा रुद्रसूक्ताचे पठण केले. शंखनाद व घंटानादात शिवआरती पार पडली. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसाधकांनी पूर्वजन्मातील व पूर्वजांचे कार्मिक दोष तसेच शारीरिक व्याधी निवारणासाठी शेणापासून तयार केलेल्या पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले.
या सोहळ्यास रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट रोहन लेले, समेष रुद्रस्वर, विश्वस्त नीता नश्विन, ज्योती मेहेरा, आर्किटेक्ट राजेश पटेल, डॉ. प्रज्ञा पटेल, संतोष राणे, संजय शिंदे, अभिनेत्री विशाखा सुभेदार, राजकिरण अजितराज, रुद्रवीर महादेव, अनेय पालके, ऋषिकेश साळुंखे यांसह विविध भागांतून आलेले हजारो शिवभक्त उपस्थित होते.
अलीकडील काळात या स्फटीक शिवलिंगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने यंदाच्या महाशिवरात्री उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी रुद्रनाद फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सावरवाड व कुसरवेवाडी येथील ग्रामस्थांनी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू होता.








