मालवण (प्रतिनिधी):
मालवण शहरातील अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट येथून आणण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पवित्र पादुकांचे पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या धार्मिक सोहळ्यास मालवण शहर व परिसरातील स्वामीभक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली.
चोळप्पा महाराज यांचे वंशज वेदमूर्ती नितीन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणवृंदांनी स्वामी समर्थांच्या चर्म पादुका विधिवत आणून पूजन केले. सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मंत्रोच्चारात पूजाविधी पार पडला. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळपर्यंत भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर स्वामीभक्तीच्या जयघोषाने आणि आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता.
या प्रसंगी अॅड. उल्हास कुळकर्णी, अॅड. प्राची कुळकर्णी, अॅड. अमेय कुळकर्णी यांच्यासह कुळकर्णी कुटुंबीय आणि इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







