Open underground electricity boxes in Malvan’s Rajkot area pose a serious risk to public safety. BJP corporator Mandar Keni has demanded immediate closure of these electric boxes, warning of protest if action is not taken.
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील राजकोट भागात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी बसविण्यात आलेल्या विद्युत पेट्या नादुरुस्त अवस्थेत असून अनेक ठिकाणी त्या उघड्या स्थितीत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी शॉक लागून अपघात होण्याची दाट शक्यता असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच जनावरे यांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित विद्युत पेट्या तात्काळ बंदिस्त करून दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा भाजपचे नगरसेवक मंदार केणी यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राजकोट भागातील भूमिगत वीज वाहिन्यांच्या विद्युत पेट्या गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त असून त्या उघड्या स्थितीत आहेत. याच ठिकाणी यापूर्वी विद्युत शॉक लागून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबंधित वीज वाहिनी तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विद्युत पेट्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे मंदार केणी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
“गेल्या पाच वर्षांपासून जर भूमिगत वीज वाहिन्यांची ही अवस्था असेल, तर नव्याने करण्यात आलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामावर नागरिकांचा विश्वास कसा बसेल? तसेच भविष्यात अशा कामांना नगरपरिषदेकडून मंजुरी देताना लोकप्रतिनिधी विचार करतील का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राजकोट येथील या विद्युत पेट्यांच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. चुकून कोणाचा हात अथवा पाय या उघड्या पेट्यांना लागल्यास गंभीर दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन सर्व उघड्या स्थितीतील विद्युत पेट्या बंदिस्त कराव्यात व आवश्यक ती दुरुस्ती करावी, अन्यथा उपोषणासह आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा ठाम इशारा मंदार केणी यांनी दिला आहे.







