Bharatiya Mazdoor Sangh has announced it will not participate in the politically motivated strike called on February 12, urging workers to stay away from politically driven protests, said Maharashtra state secretary Hari Chavan.
मालवण | प्रतिनिधी : देशातील काही कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाने १२ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा नसून, हा संप राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी केला आहे. या संपात भारतीय मजदूर संघ तसेच त्याच्या संलग्न संघटना सहभागी होणार नाहीत. कामगार क्षेत्राला राजकीय स्वार्थांपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याने कामगारांनी या संपात सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
हरी चव्हाण यांनी स्पष्ट केले की, भारतीय मजदूर संघ केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांचे स्वागत करते. यातील वेतन संहिता व सामाजिक सुरक्षा संहिता या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचे संघटनेचे मत आहे. मात्र उर्वरित दोन संहितांमधील काही तरतुदींविषयी संघटनेने केंद्र सरकारकडे आपली चिंता व हरकती नोंदवल्या आहेत.
या संदर्भात १३ व २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय मजदूर संघ आणि केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीत मांडलेल्या हरकतींवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन श्रम मंत्र्यांनी दिल्याची माहिती हरी चव्हाण यांनी दिली. याशिवाय कामगार क्षेत्राशी संबंधित इतरही अनेक मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या असून त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
भारतीय मजदूर संघ सरकारच्या सकारात्मक व कामगार हितैषी धोरणांना सातत्याने पाठिंबा देत आला असून, कामगारांच्या हितांच्या विरोधात असलेल्या धोरणांना ठामपणे विरोध करत आपल्या हरकती शासनदरबारी मांडत राहिला आहे. मात्र राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये संघटना सहभागी होत नाही, कारण कामगारांचे प्रश्न राजकीय स्वार्थासाठी वापरले जाऊ नयेत, असेही हरी चव्हाण यांनी नमूद केले.
त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या संपाला भारतीय मजदूर संघाचा कोणताही पाठिंबा नसून, संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कामगारांनी नियमित कामावर उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.







