मालवण : प्रतिनिधी
मसुरे–मर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार क्षमा हडकर यांनी निर्णायक विजय मिळविला. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार आनंदी परब यांचा त्यांनी ५३२ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात निवडणूक चुरशीची ठरली असली तरी अंतिम फेरीत भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेत विजय निश्चित केला.
निकालानुसार क्षमा हडकर यांना एकूण ३,४२२ मते मिळाली, तर आनंदी परब यांना २,८९० मते प्राप्त झाली. या निवडणुकीत ‘नोटा’ला २०६ मते मिळाली.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चुरस पाहायला मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
विजयानंतर क्षमा हडकर यांनी मतदारांचे आभार मानत विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. या विजयामुळे मसुरे–मर्डे भागात भाजपचे राजकीय बळ अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.







