मालवण : सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, शैक्षणिक वर्ष २०२५ / २०२६ साठीच्या ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा, १० फेब्रुवारी २०२६ पासून बारावीच्या आणि २० फेब्रुवारी २०२६ पासून दहावीच्या लेखी परीक्षा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी विद्यार्थीनींनी त्यांचे आजपर्यंतचे शिक्षण, सराव आणि अभ्यास यांचा समंजसपणे मेळ घालत परीक्षांना सामोरे जायचे आवाहन केले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले आहे की, इयत्ता दहावी व बारावी हे शालेय शिक्षणातील दोन महत्वाचे टप्पे आहेत. या दोन्ही टप्प्यांमधून जीवनाचे गांभीर्य, व्यवहार चातुर्य याची दिशा मिळते. प्रसन्नपणाने घेतलेल्या शालेय शिक्षणामुळे, आपल्या आवडत्या तसेच इतर कुठल्याही क्षेत्राबद्दलचे ‘व्हीजन’ सकारात्मक पणे विकसीत होत जाते. शेतीपासून, कार्यालयीन कामे, व्यवसाय किंवा अगदी अंतराळ प्रवासापर्यंतच्या सर्वच क्षेत्रात शालेय शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
आपले व्यक्तिमत्व हे आपले कुटुंब, आपली प्रशाला, आपला गांव तसेच तालुका, जिल्हा या सर्वांना उपयुक्त ठरवण्याची संधी म्हणजे या परीक्षा असल्याचेही श्री दत्ता सामंत यांनी नमूद केले आहे.
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या सारख्या शिक्षणाने समृद्ध असलेल्या व्यक्तीमत्वांचा, लोकप्रतिनिधी म्हणून मार्गदर्शनपर आदर्श लाभलेला असून आगामी काळातील विविध विकासात्मक घटकांसाठी शैक्षणिक गांभीर्य महत्वाचे आहे.
मागील सर्व परीक्षांमधील निकालांना विसरून नव्या प्रसन्नतेने आपापल्या आवश्यक ओळखपत्र वगैरेंना काळजीपूर्वक सोबत घेऊन आपापल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित रहायचे आवाहन देखिल जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.







