Shri Devi Bharadi Yatra will be held on 9–10 February in Anganewadi, Malvan. Thousands of devotees expected. Darshan timings, queues, transport and facilities arranged.
मालवण दि (प्रफुल्ल देसाई)
प्रति पंढरपूर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीचा यात्रोत्सव उद्या दिनांक ९ फेब्रुवारी रोजी होत असून या यात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्तांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी नटून थटून सजली आहे देवीच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडणे आणि बोलण्यासाठी जे लाखो भावी उद्या आंगणेवाडी मध्ये येणार आहेत त्यांना देवीचे दर्शन सुलभ होण्याच्या दृष्टीने आंगणे कुटुंबीय, आंगणे ग्रामस्थ मंडळ यांच्यासह प्रशासन सज्ज झाले आहे

जवळपास दीड दोन महिने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि आंगणे कुटुंबीय यांनी अहोरात्र मेहनत घेत देवीचा वार्षिकोत्सव सुलभ रित्या पार पडावा यासाठी जे अथक परिश्रम घेतले तो क्षण उद्या ९ फेब्रुवारी रोजी येऊन ठेपल्याने भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यानी आंगणेवाडी व परिसर गजबजुन गेला आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा सर्वदूर पसरला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक भराडी देवीच्या यात्रेला येतात. डिसेंबर महिन्यात आंगणेवाडी यात्रेची तारीख ठरल्यानंतर गेले दोन महिने आंगणे ग्रामस्थ व प्रशासनाकडून या यात्रेची तयारी करण्यात येत होती. उद्या ९ रोजी भराडी देवींची यात्रा होत असून ही यात्रा १० रोजी सायंकाळपर्यंत चालणार आहे.

उद्या पहाटे ३ वाजल्यापासून भराडी देवीचे दर्शन सुरु होऊन ओट्या भरण्यास सुरुवात होणार आहे. तर रात्री ९ वाजता देवीला प्रसाद दाखविण्याच्या विधीसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्री १ वाजता पुन्हा दर्शन सुरु करण्यात येणार आहे.

दि. १० रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत देवीचे दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे अर्धा ते पाऊण तासात भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. तसेच दिव्यांग भाविकांसाठी मंदिरापर्यंत ने- आण करण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाविकानी संयम व शिस्त बाळगुन देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यानी केले.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराचा सभामंडप व गाभाऱ्याचे फुलांची आरास करण्यात आली आहे यात्रेसाठी खाद्यपदार्थ व प्रसाद, खेळणी, कपडे, भांडी, सजावट साहित्य, शोभेच्या वस्तू, हॉटेल्स अशी विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी प्रशासनाकडून बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रा परिसरातील मालवण, मसुरे व कणकवलीच्या दिशेने एसटी बस वाहनतळ व इतर वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतर्फे दरवर्षीप्रमाणे आंगणेवाडी यात्रेत महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ सोहळ्याचे प्रमुख अतिथी उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि नाबार्ड जिल्हा प्रबंधक श्रीम. दिपाली माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँकेचे संचालक संदीप परब, व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, आंगणेवाडी विकास समिती, अध्यक्ष सतीश आंगणे मावीम जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे , जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) व्यवस्थापक वैभव पवार जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, आदि मान्यवर तसेच जिल्हा बँक अधिकारी, शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यात्रेच्या दोन्ही दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार असून भाविक ग्राहकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन जिल्हा बँकेकडून करण्यात आले आहे.








