A major boost for Konkan as the Maharashtra government issues a decision to develop the cashew industry following efforts by Minister Nitesh Rane
मुंबई:
महाराष्ट्रातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासाला ठोस चालना मिळणार आहे.
राज्यात कोकणासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काजू लागवड केली जाते. सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर काजूची लागवड असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला या उद्योगाचा मोठा आधार आहे. मात्र उत्पादनवाढ, प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण, बाजारपेठ विस्तार व निर्यात वाढ यासाठी स्वतंत्र धोरणात्मक हस्तक्षेपाची गरज दीर्घकाळापासून व्यक्त होत होती.
ही बाब लक्षात घेऊन मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर निवेदन सादर करत काजू बोर्डाच्या कार्यक्षेत्रात लागवड वाढ, उत्पादकता वृद्धी, संशोधन, प्रक्रिया उद्योगांना चालना, ब्रँडिंग व मार्केटिंग सक्षमीकरण यांचा समावेश करण्याची मागणी केली होती.
काजू बोर्डाचे संचालक परशुराम पाटील यांनीही या विषयावर मंत्री नितेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत राज्यातील काजू उद्योगास भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच संभाव्य उपाययोजना शासन पातळीवर प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या सक्रिय पुढाकारामुळे हा विषय धोरणात्मक पातळीवर मार्गी लागण्यास मदत झाली.
मंत्री नितेश राणे व काजू बोर्ड प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेत संबंधित प्रस्तावास मान्यता दिली आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योगातील उद्योजक आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे. तसेच महाराष्ट्राचा काजू उद्योग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक होणार आहे.
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे म्हणाले,
“या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे. काजू हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी आणि उद्योजकांना बळकटी देणे हे आमचे प्राधान्य आहे. कोकणच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
याचवेळी या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. राज्याच्या कृषी व ग्रामीण विकासाला गती देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष अभिनंदन केले.
या शासन निर्णयाचे राज्यातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योग क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, उद्योगाला नवे बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.








