Students turned into young traders at Bhandari Primary School, Malvan, as the weekly market initiative received an enthusiastic response from parents and locals.
मालवण (प्रतिनिधी) :
“ओ हयसर येवा… ताजी ताजी भाजी घेवा… सुके माशे घेवा… उकडे तांदूळ घेवा… लाडू घेवा… गारेगार सरबत घेवा…” अशा आकर्षक आरोळ्या देत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर भरलेल्या ‘आठवडा बाजारात’ व्यापारी बनलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. विद्यार्थ्यांनी थाटलेल्या या आगळ्या-वेगळ्या बाजाराला पालक, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदी करून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला प्रोत्साहन दिले.
भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबई संचलित भंडारी प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा व आठवडी बाजार’ हा अभिनव उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, गणिती कौशल्ये, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने प्रशालेत दरवर्षी ‘शालेय आठवडी बाजार’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या लोकल कमिटीचे सचिव दशरथ कवटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी लोकल कमिटी सदस्य विठ्ठल साळगावकर, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिका सौ. राधा दिघे, श्री. आर. बी. देसाई, सेवानिवृत्त कर्मचारी नंदकिशोर मळेकर, शिक्षक श्री. भोगले, शिक्षिका श्रीम. स्वाती दळवी, सौ. तृप्ती वालावलकर, सौ. योगिता तारी, माजी विद्यार्थी भूषण मेतर तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी ‘व्यापारी’ ही भूमिका साकारत प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे स्टॉल्स उभारून एका छोट्या बाजारपेठेचे स्वरूप निर्माण करण्यात आले होते. या बाजारात ताजी फळे व भाज्या, हंगामी फळे, लाडू, चिवडा, उकडीचे मोदक यांसारखे घरगुती खाद्यपदार्थ, सुकी मासळी, उकडे तांदूळ, काजुगार व इतर मालवणी मेवा, थंडपेय तसेच शालेय साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपल्या दुकानांची मांडणी करत केवळ विक्रीच नव्हे तर पैशांचा हिशोब ठेवणे, सुट्टे पैसे परत देणे आणि ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधणे याचे उत्तम प्रात्यक्षिक सादर केले. या बाजारात शिक्षकांसह पालक व स्थानिक नागरिकांनी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तकी ज्ञानासोबतच अशा प्रकारचे व्यावहारिक शिक्षण मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असून भंडारी प्राथमिक शाळेचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे, अशी भावना उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली.








