An Olive Ridley turtle was found dead at Chivla Beach, Malvan. Forest Department conducted panchnama and disposed of the carcass as per procedure.
मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण येथील चिवला बीचवर ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) जातीचे एक दुर्मिळ समुद्री कासव मृतावस्थेत आढळून आले. समुद्रकिनारी फिरणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी तातडीने प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांना याबाबत माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिल्पा खोत यांनी तत्काळ कांदळवन वनविभागाशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कांदळवन वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी कासवाचा रीतसर पंचनामा केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कासवाची सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी कांदळवन परिमंडळ वनाधिकारी एस. ए. सुतार, वनमजूर रमाकांत मांजरेकर, नितेश गितये आदी उपस्थित होते.
समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ समुद्री कासव मृतावस्थेत आढळल्याने सागरी जीवसृष्टीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने नागरिक व पर्यटकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनारी जखमी किंवा मृत सागरी जीव आढळून आल्यास तात्काळ वनविभाग अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, जेणेकरून वेळेत योग्य ती कार्यवाही करता येईल.







