Varadkar High School and Junior College, Katta, shines at the national Samriddhi competition organized by NCERT, with art teachers Sameer and Simran Chandrakar representing Maharashtra at RIE Bhubaneswar.
मालवण | प्रतिनिधी
शिक्षा मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली आणि राष्ट्रीय कला उत्सव अंतर्गत माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समृद्धी कार्यक्रमात वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर व सहाय्यक शिक्षिका सिमरन समीर चांदरकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दि. २७ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रादेशिक शिक्षण संस्था (RIE), भुवनेश्वर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी वराडकर हायस्कूल ही एकमेव शाळा ठरली असून या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सर्व राज्यांमधून ६८ संघांनी सहभाग नोंदवला होता. विभाग व राज्यस्तरावरून निवड झालेल्या सुमारे ५,००० शिक्षकांमधून अंतिम टप्प्यासाठी निवड झालेल्या शिक्षकांनी या मंचावर आपली अध्यापन कौशल्ये सादर केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अध्यापनात कलेचे महत्त्व अधोरेखित करत Art Integrated Pedagogy (कला एकात्मिकरण अध्यापन पद्धती) अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांचे सादरीकरण करण्यात आले.
या स्पर्धेत वराडकर हायस्कूलचे शिक्षक समीर चांदरकर व सिमरन चांदरकर यांनी पिंगुळी येथील पारंपरिक ठाकर आदिवासी कला आणि कळसुत्री बाहुल्यांच्या नाट्यीकरणाच्या माध्यमातून इयत्ता नववीच्या संस्कृत पाठावर आधारित “किं मिथ्या? किं वास्तवम्?” या विषयाचे प्रभावी सादरीकरण करून परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली. स्थानिक लोककलेची सांगड अध्यापनाशी घालून विद्यार्थ्यांना विषय अधिक रंजक व समजण्यास सोपा करण्याचा हा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर विशेष लक्षवेधी ठरला.
वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांच्या या यशाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड.एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका वराडकर हायस्कूल कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले.







