Malvan Premier League 2026: Leather ball T20 cricket tournament from Feb 22 to March 1 at Topiwala School Ground, Malvan. Registration details inside.
मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवणकरांच्या क्रीडाप्रेमाला नवी उभारी देण्यासाठी आणि स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लब सज्ज झाला आहे. यंदा अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मालवण प्रीमियर लीग २०२६’ या लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार नववे वर्ष असून ही स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर रंगणार आहे.
या स्पर्धेत विजेत्या संघाला ५५ हजार रुपये, उपविजेत्या संघाला ३३ हजार रुपये तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्थानिक तसेच बाहेरील दर्जेदार खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाचा हंगाम अधिकच चुरशीचा आणि रोमांचक ठरणार आहे.
स्पर्धेत सहभागासाठी प्रवेश फी १५ हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, स्पर्धेचे स्वरूप मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्या ८ संघांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक संघमालकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सुशील शेडगे – ७४९९९५५१४७ आणि ज्ञानेश केळुसकर – ९३२५२३३३७९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, ज्या वैयक्तिक खेळाडूंना या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवायचा आहे, त्यांच्यासाठी विशेष नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हे फॉर्म गुडलाईफ मेडिकल, विदर्भ कोकण बँकेसमोर, भंडारी हायस्कूल रोड, मालवण येथे उपलब्ध असून १० फेब्रुवारीपर्यंत २०० रुपये फॉर्म फी भरून नोंदणी करता येणार आहे.
विशेष बाब म्हणजे, जे खेळाडू फॉर्म भरूनही लिलावात अनसोल्ड राहतील, त्यांच्या मनोधैर्याला चालना देण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लबतर्फे त्यांना लेदर बॉलचा एक विशेष प्रदर्शनीय सामना खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. यामुळे नवोदित खेळाडूंनाही आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे.
मालवणकर क्रीडाप्रेमींनी या क्रिकेट महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.







