Malvan News: Maatrutva Aadhar Foundation distributes exam kits to needy Class 10 students in Malvan; Sagar Wadkar motivates students saying SSC & HSC exams shape future direction.
मालवण, प्रतिनिधी :
शैक्षणिक विश्वात दहावी व बारावीच्या परीक्षांना विशेष महत्त्व दिले जाते. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आज विद्यार्थी उभे असून दहावी–बारावी या केवळ परीक्षा नसून तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणारे मैलाचे दगड आहेत, असे प्रतिपादन मालवणचे सुपुत्र व मातृत्व आधार फाउंडेशनचे सल्लागार सागर वाडकर यांनी केले.
मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने शहरातील भंडारी ए. सो. हायस्कूल तसेच इतर शाळांमधील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक शालोपयोगी साहित्याची किट वितरित करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळून परीक्षेच्या तयारीस हातभार लागणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, दादा वेंगुर्लेकर, प्रा. रामचंद्र काटकर, संजय हंजणकर, जगदीश तोडणकर, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, संजय दत्ताराम लुडबे, दिक्षा लुडबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
‘यश म्हणजे फक्त गुण नव्हेत’ – संतोष लुडबे
यावेळी मार्गदर्शन करताना संतोष लुडबे म्हणाले,
“यश म्हणजे केवळ जास्त गुण मिळवणे एवढेच नसते. स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करणे हेच खरे यश आहे. शेवटच्या क्षणी केलेल्या अभ्यासावर यश अवलंबून नसते. दररोज थोडा-थोडा अभ्यास केल्यास विषय मनावर ठसतात.”
विद्यार्थ्यांनी अपयशाची भीती न बाळगता मन लावून अभ्यास करावा, तसेच शिक्षक व पालक हे आपले मार्गदर्शक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम
या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले असून, सामाजिक भान जपत मातृत्व आधार फाउंडेशनने शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.







