Malvan News: Legal awareness session on NALSA Veer Parivar Sahayata Yojana 2025 held in Malvan for defence personnel, ex-servicemen and their families with free legal aid guidance.
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुका विधी सेवा समिती, मालवण व वसुंधरा जनकल्याण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे ‘वीर परिवार सहायता योजना’ (NALSA Veer Parivar Sahayata Yojana 2025) संदर्भात माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबित कुटुंबीयांना मोफत व सक्षम कायदेशीर सेवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) वीर परिवार सहायता योजना २०२५ अंतर्गत संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना कायदेविषयक बाबींमध्ये मोफत कायदेशीर मदत व सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची मालवण तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच योजनेबाबत सविस्तर माहिती व जनजागृती व्हावी, या उद्देशाने दिवाणी न्यायालय, मालवण येथे माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ॲड. सुमित जाधव, ॲड. अक्षय सामंत, ॲड. प्राजक्ता गावकर, ॲड. हेमेंद्र गोवेकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. त्यांनी संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना कौटुंबिक, मालमत्ता, सेवा-संबंधित व इतर कायदेशीर प्रश्नांवर मोफत विधी सहाय्य कसे मिळेल याची सविस्तर माहिती दिली. तसेच, योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया, संपर्क यंत्रणा व उपलब्ध सुविधा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या माहिती सत्रास सुभेदार रमेश परब, सार्जंट गणेश बांदेकर, नायक बाळकृष्ण हडकर, लान्सनायक गुरुनाथ परब, सुनील आरोलकर (स्थलसेना), धनंजय सावंत (पीओ), नरेश करलकर (स्थलसेना), सुधीर लोंढे (स्थलसेना), महादेव परब (स्थलसेना) यांच्यासह अनेक संरक्षण कर्मचारी व माजी सैनिक उपस्थित होते.
तसेच वसुंधरा जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, उपाध्यक्ष ॲड. तारिका कुबल-चिंदरकर, तालुका विधी सेवा समिती मालवणच्या वरिष्ठ लिपीक उमा मालंडकर, लिपीक मिलिंद जाधव, ॲड. रत्नदीप कदम, ॲड. प्रथमेश देसाई, वत्सला मणचेकर, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मालवण तालुक्यातील संरक्षण कर्मचारी व माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता मिळाली असून, भविष्यात उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणींमध्ये विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत मदत मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांमध्ये निर्माण झाला. यामुळे वीर जवानांच्या कुटुंबीयांना सामाजिक व कायदेशीर आधार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.








