CTET exam candidates among teachers get relief as election duty exemption is granted by the Maharashtra State Election Commission.
मुंबई | प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यांतून सूट देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिले आहेत. यासंदर्भात सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून, काही शिक्षकांची CTET परीक्षा नियोजित असल्यामुळे त्यांना निवडणूक कर्तव्य बजावणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांना निवडणूक कामकाजातून सूट देऊन पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानिधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुःखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १३५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी नियोजित असलेले मतदान पुढे ढकलून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.
शिक्षकांच्या परीक्षेमुळे विशेष व्यवस्था
त्याच दिवशी काही शिक्षकांची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) असल्यामुळे, या परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यांतून सूट देण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पर्यायी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेत पर्यायी व्यवस्था करावी. तसेच CTET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
शिक्षक संघटनांकडून स्वागत
राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, परीक्षेच्या तयारीत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक कर्तव्य आणि परीक्षेचा ताण एकाच वेळी टाळल्यामुळे शिक्षकांना मानसिक दिलासा मिळणार आहे.







