Sindhudurg News: Weekly markets in Devgad, Kankavli, Malvan, Sawantwadi and Dodamarg will remain closed on 7 February 2026 due to ZP and Panchayat Samiti elections as per DM orders.
सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांच्या ठिकाणी तसेच ज्या-ज्या गावांमध्ये आठवडा बाजार भरतो, त्या सर्व ठिकाणी मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, मतदान केंद्रांवर गर्दीचे व वाहतुकीचे अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी बंद राहणारे आठवडा बाजार (गावांची यादी)
मतदानाच्या दिवशी खालील गावांतील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत –
देवगड तालुका : मिठबांव
कणकवली तालुका : खारेपाटण
मालवण तालुका : सुकळवाड, माळगांव
सावंतवाडी तालुका : आरोंदा, कलंबीस्त
दोडामार्ग तालुका : साटेली भेडशी
प्रशासनाच्या आदेशानुसार, या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी पर्यायी दिवशी बाजार भरविण्याबाबत नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज
मतदानाच्या दिवशी बाजार बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असून, मतदान केंद्रांजवळील गर्दी टाळता येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अडथळ्याविना आपला लोकशाही हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







