२९ महापालिका निवडणुकीत सरस कामगिरी केल्यानंतर भाजपाने आता मिशन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत असून, स्थानिक पातळीवर भाजपा नेत्यांबरोबरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रचारात उतरणार आहेत.
प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळणार असून, मुख्यमंत्री फडणवीस तब्बल २२ सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात दिसणार आहेत. १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी पुढील सात दिवसांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या २२ सभा होणार आहेत.
२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात मुख्यमंत्री फडणवीस झंझावाती प्रचार दौरा करणार आहेत. २८ जानेवारी रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. त्यानंतर ३ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही सभा होणार आहेत.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.







