मालवण : भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे गुरुवार दि. 22 जानेवारी 2026 रोजी इयत्ता 12 वी कला–वाणिज्य व इयत्ता 11 वी कला–वाणिज्य या दोन वर्गांमध्ये दोन स्मार्ट बोर्डचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सन 2023-24, 2024-25 व 2025-26 या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा प्रदान (निरोप समारंभ) कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीतून हे स्मार्ट बोर्ड खरेदी करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमावेळी इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हे दोन्ही स्मार्ट बोर्ड संस्थेकडे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आले. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर सर यांच्या हस्ते इयत्ता 12 वी कला–वाणिज्य वर्गातील स्मार्ट बोर्डचे अनावरण करण्यात आले.
तर इयत्ता 11 वी कला–वाणिज्य वर्गातील स्मार्ट बोर्डचे उद्घाटन अकाउंटन्सी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक श्री. लवू परब (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकल कमिटी सेक्रेटरी श्री. दशरथ कवटकर, प्राचार्य श्री. तिवले सर, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्मार्ट बोर्डमुळे अध्यापन अधिक प्रभावी, आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित होणार असून डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी निरोप समारंभातून जमा झालेल्या निधीचा शैक्षणिक उपयोगासाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.







