नवी दिल्ली | प्रतिनिधी
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांसाठी आता सरकारने कडक भूमिका घेतली आहे. एका वर्षात पाच वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यास संबंधित चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यांसाठी रद्द केला जाणार आहे. दळणवळण मंत्रालयाने नवीन मोटार वाहन सुधारणा नियमांमध्ये ही तरतूद केल्याचे वृत्त आहे.
या नव्या नियमानुसार सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे यासारखे तुलनेने किरकोळ वाटणारे नियमही आता गंभीर स्वरूपात घेतले जाणार आहेत. एका वर्षात अशा पाच किंवा त्यापेक्षा अधिक उल्लंघनांची नोंद झाल्यास चालकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे.
आरटीओ व जिल्हा परिवहन कार्यालयाला अधिकार
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. मात्र परवाना रद्द करण्यापूर्वी संबंधित वाहनचालकाची बाजू ऐकून घेणे बंधनकारक असणार आहे. या नव्या नियमाचे अधिकृत नोटीफिकेशन बुधवारी जाहीर करण्यात आले असून, १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
जुने गुन्हे ग्राह्य धरले जाणार नाहीत
नव्या नोटीफिकेशननुसार, एका वर्षापूर्वी केलेले वाहतूक नियमांचे उल्लंघन पुढील वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. सध्या एकूण २४ प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाहन परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. यामध्ये वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण, वेगमर्यादा ओलांडणे, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल भरणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस सोडून जाणे यांचा समावेश आहे.
नव्या तरतुदींमुळे कडक कारवाई
मात्र आता या यादीत हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे यांसारख्या गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे नियम हलक्याने घेतल्यास वाहनचालकांना मोठा फटका बसू शकतो. या नव्या कडक तरतुदींमुळे रस्ते सुरक्षिततेला चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे.





