वेंगुर्ले | प्रतिनिधी
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी) योजनेंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील पथविक्रेत्यांना कर्ज वितरण तसेच क्रेडिट कार्ड उद्घाटन सोहळा दिनांक २३ जानेवारी रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथून पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांनी पाहिले.
या योजनेंतर्गत स्थानिक पथविक्रेत्यांचे अभिसरण करून त्यांचे क्रेडिट कार्डसाठीचे अर्ज संबंधित बँकांकडे पाठविण्यात आले. पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभुखानोलकर, नगरसेवक सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर, सदानंद गिरप, नगरसेविका शीतल आंगचेकर, गौरी माइणकर, काजल कुबल, रिया केरकर, लिना म्हापणकर, आकांक्षा परब, नगरसेवक सचिन शेटये, तसेच प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील, गणेश कांबळे, संगीता कुबल, ज्ञानेश्वर जाधव, नगरपरिषदेचे कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होत असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.





