मालवण | प्रतिनिधी
राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित समजपूर्वक वाचन – कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्यातील शाळा कोळंब नं. १ येथील शिक्षिका सौ. मधुचंदा निखिल वस्त यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यशाच्या जोरावर त्यांची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील शिक्षकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुका, विभाग आणि राज्य अशा तीन स्तरांवर ही स्पर्धा पार पडली.
सौ. मधुचंदा वस्त यांनी मालवण तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या या विभागीय स्पर्धेत कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून प्रथम आलेल्या शिक्षकांचा सहभाग होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत त्यांनी पाचवा क्रमांक मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.
या यशाबद्दल मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, सौ. आरती कांबळी, सौ. नार्वेकर, तसेच शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

समजपूर्वक वाचन म्हणजे नेमकं काय?
समजपूर्वक वाचन म्हणजे केवळ मजकूर वाचणे नव्हे, तर वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून घेणे, त्यामागील विचार ओळखणे, आशयाचे विश्लेषण करणे आणि त्यावर स्वतःचे मत तयार करणे होय. वाचन करताना शब्दांची ओळख, वाक्यरचना, आशय, भावना आणि संदर्भ यांचा समन्वय साधला जातो. विद्यार्थ्यांनी “काय लिहिले आहे?” याबरोबरच “का लिहिले आहे?” आणि “याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे?” हे समजून घेणे म्हणजेच समजपूर्वक वाचन.
समजपूर्वक वाचन का गरजेचे आहे?
समजपूर्वक वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, विश्लेषण क्षमता, भाषिक कौशल्य, कल्पकता आणि आत्मविश्वास विकसित होतो. केवळ पाठांतरावर आधारित शिक्षणाऐवजी अर्थपूर्ण शिक्षणाची पायाभरणी यामुळे होते. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रश्न समजून घेणे, अचूक उत्तर मांडणे आणि तर्कशुद्ध विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व गुण समजपूर्वक वाचनातूनच विकसित होतात.
याच उद्देशाने राज्य शासनाने शिक्षकांसाठी समजपूर्वक वाचन स्पर्धा आयोजित करून शिक्षकांची वाचनक्षमता, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याची कौशल्ये अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. सौ. मधुचंदा वस्त यांचे यश हे शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनाचे आणि वाचनसंस्कृतीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.





