मालवण, दि. प्रतिनिधी
मालवण मच्छी मार्केटमधील अतिक्रमणाबाबत चार दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने नोटीसा बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतर मत्स्य विक्रेत्या महिलांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवणमधील मत्स्य विक्रेत्या महिलांनी भाजपच्या नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट नगरपालिकेत धडक देत आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने नगरसेविका आचरेकर यांच्यासह महिलांनी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची भेट घेऊन प्रशासनाने बजावलेल्या नोटीसांबाबत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. मच्छी मार्केटमध्ये बांधण्यात आलेले ओटे चुकीच्या पद्धतीचे असून त्यांची संख्या अपुरी आहे. अशा परिस्थितीत महिलांना मार्केटमध्येच बसण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा आरोप नगरसेविका आचरेकर यांनी केला.
विक्रेत्यांच्या मूलभूत समस्या सोडविल्याशिवाय नोटीसा बजावणे म्हणजे प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नगरसेविका आचरेकर यांनी मत्स्य विक्रेत्या महिलांवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये, अशी ठाम मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी नोटीसा दिल्या असल्या तरी महिलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, मच्छी मार्केटच्या नूतनीकरणासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मिळावा, यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा वराडकर यांनी सांगितले. तसेच या प्रश्नाकडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येईल, अशी माहिती नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी दिली.
यापूर्वी नगराध्यक्षा वराडकर यांनी नगरसेवकांसह मच्छी मार्केटला भेट देऊन विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. मात्र त्यानंतरच अडथळा निर्माण करणारे साहित्य हटविणे व ८ जानेवारीपर्यंत अतिक्रमण दूर करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली होती.
यावेळी भाजपच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब, सन्मेष परब, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर तसेच शिवसेनेचे नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेविका पूनम चव्हाण, मेघा गांवकर, नीना मुंबरकर, सहदेव बापर्डेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर आदी उपस्थित होते.
नगरसेविका अन्वेषा आचरेकर म्हणाल्या की, मंडईत केवळ ६९ अधिकृत ओटे असून प्रत्यक्षात २५० हून अधिक विक्रेत्या आहेत. उर्वरित महिलांनी व्यवसाय कुठे करायचा, हा गंभीर प्रश्न आहे. बाजार कराच्या पावतीवर तारीख व अधिकृत शिक्का नसणे, दरवाजाचा अभाव, मोकाट जनावरांचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, स्वच्छतागृहांची दुरवस्था, कचरा ट्रॉलीची कमतरता, तुंबलेली गटारे, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि अपुरा प्रकाश अशा अनेक समस्यांशी महिलांना झुंज द्यावी लागत आहे. अशा स्थितीत कारवाईच्या नोटीसा अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मच्छी मार्केटमध्ये स्वच्छता राखणे आवश्यक असून, लाईट, दरवाजे, पाणी आदी सुविधा प्राधान्याने देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी निधी मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी कोणत्याही मत्स्य विक्रेत्या महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मच्छी मार्केटच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळ व अन्य शासकीय योजनांतून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी आमदार निलेश राणे यांना निवेदन दिले जाईल, असे स्पष्ट केले. तोपर्यंत तातडीच्या दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. यावर मत्स्य विक्रेत्या महिलांनी स्वच्छता व अडगळ हटविण्यास प्रशासनाला सहकार्य करू, अशी भूमिका मांडली.





