मालवण | प्रतिनिधी – पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी ठाम मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले. वायंगणी ग्रामपंचायत ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय या मार्गावर जनजागृती रॅली काढत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही रॅली पुढे सभेत रूपांतरित झाली.
सभेचे अध्यक्षपद वायंगणीचे सरपंच रुपेश पाटकर यांनी भूषविले. यावेळी ज्ञानदीप संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू, संस्था खजिनदार सौ. समृद्धी आसोलकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रसिका सावंत, शामसुंदर नाईक, संजना रेडकर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वायंगणकर, उदय दुखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हडकर, संस्था सचिव वैभव जोशी, रावजी सावंत आदींनी आपले विचार मांडत शिक्षक कपात धोरणावर तीव्र टीका केली.
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, वस्तीची विरळता आणि ग्रामीण वास्तव लक्षात घेता केवळ पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून हे निकष या भागाला तंतोतंत लागू होत नाहीत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याची ठोस भूमिका सभेत मांडण्यात आली. शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, सभेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक गरजा आणि स्पर्धात्मक युग लक्षात घेता ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम आवश्यक असल्याचे मत पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासन दरबारी मान्यता मिळवण्याचा ठरावही पारित करण्यात आला.
ग्रामपंचायत वायंगणी, ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समितीने सेमी-इंग्लिश माध्यम सुरू करण्यासाठी ज्ञानदीप संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.
ही जनजागृती रॅली शांततामय मार्गाने पार पडली. विद्यार्थ्यांचे हित, दर्जेदार शिक्षण आणि ग्रामीण शाळांचे अस्तित्व टिकवणे हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या आंदोलनाचे आयोजन ग्रामपंचायत वायंगणी, ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समिती आणि ज्ञानदीप संस्था, वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.





