श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे आज ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असून, सर्वांनी अभियानाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
बैठकीदरम्यान शाळेचे महत्त्व, ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज आणि भविष्यातील पिढीच्या शैक्षणिक हक्कांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शाळा टिकवणे म्हणजेच गावाचे भविष्य सुरक्षित करणे, असा ठाम सूर उपस्थितांमधून उमटला.
यावेळी उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची तयारी दर्शविली. शिक्षण वाचवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज असून, हा लढा शांततामय आणि संघटित पद्धतीने लढला जाईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमुळे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या चळवळीला नवे बळ मिळाले असून, गावात एकजूट आणि जागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





