मालवण : (प्रतिनिधी)
डी.एड. कॉलेज, मालवण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या आदरभावाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैताली शिंदे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नसून समाजक्रांतीच्या अग्रदूत होत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे आणि संग्राम कासले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता, स्त्री सक्षमीकरणातील त्यांचे योगदान तसेच शिक्षकांच्या सामाजिक जबाबदारीवर वक्त्यांनी सखोल मांडणी केली.
कार्यक्रमास डी.एड. कॉलेज, मालवणचे प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ऐश्वर्या धुरी यांनी मानले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





